Saturday, March 4, 2023

'स्पोर्टस जर्नलिस्टस असोसिएशन ऑफ नागपूरची वार्षिक क्रिकेट स्पर्धा एक हॅपनिंग इव्हेंट'

स्पोर्टस जर्नलिस्टस असोसिएशन ऑफ नागपूरची वार्षिक क्रिकेट स्पर्धा म्हणजे नागपूरच्या पत्रकारजगतातील हॅपनिंग इव्हेंट असतो. वर्षभर न भेटणारे, विविध वृत्तपत्रांमध्ये काम करणारे कितीतरी जण एकाच ठिकाणी भेटण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे एसजेएएनची क्रिकेट स्पर्धा.
करोनाकाळात इतरांच्या प्रत्येक प्रकारच्या समस्यांबद्दल लिहिणाऱ्या वृत्तपत्रसृष्टीलाही या कठीण काळाच्या अनेक झळा बसल्या. संस्थांचे आर्थिक नुकसान, आपल्याच सहकाऱ्यांच्या नोकऱ्या जाणे, इतर उलथापालथी आणि एकंदर अनिश्चितता वृत्तपत्रांनी अनुभवली. त्यामुळे, २०
२० नंतर ही क्रिकेट स्पर्धा होऊच शकली नाही. ती तशी झाली असती तर या स्पर्धेचे यंदाचे २५ वे वर्ष राहिले असते.
यंदाही अनिश्चितता होतीच. स्पर्धा होईल की नाही, याची खात्री नव्हती. पण, संघटनेच्या काही सदस्यांना जोर लावला, इतरांनी बळ दिले आणि स्पर्धेचा मुहूर्त ठरला. अपवाद वगळता सर्वच संघांसाठी १५ जणांचा संघ उभा कसा करायचा यापासून सगळ्याच अडचणी होत्या. आधीच्या संघातील चांगल्या खेळाडूंच्या नोकऱ्या गेलेल्या, नव्या खेळाडूंची मारामार, शारीरिक तंदुरुस्तीची वानवा अशा एक ना अनेक अडचणी समोर होत्या. पण, त्यातूनही सहा संघ उभे राहिले. १० ते १५ दिवसांचा का होईना, पण सराव केला आणि स्पर्धा सुरू झाली.


आपापल्या क्षमतेनुसार सगळे संघ लढले आणि सर्वोत्तम खेळ केला. शारीरिक तंदुरुस्ती नसणे, कमी सराव, वाढलेले वय यांचे परिणाम खेळाडूंच्या दुखापतीत झाले. दुखणारे गुडघे, मांड्या, पाय, कंबर खांदे घेऊनही जिद्दीने सगळे सामने खेळले गेले. खेळाडूंनी खेळण्याची जिगर दाखविली आणि स्पर्धेचा आनंदही घेतला. स्पर्धेत लोकमतने विजेतेपद आणि पुण्यनगरीने उपविजेतेपद पटकावले. पण, त्या पलीकडे जात या स्पर्धेकडे बघितले पाहिजे. असंख्य अडचणींवर मात करीत खेळली गेलेली ही स्पर्धा म्हणजे सहभागी सगळ्याच संघांचा विजय आहे. यंदा ही स्पर्धा खेळली जाणे आणि या स्पर्धेत सहभागी होऊन संपूर्ण उत्साहाने खेळणे, हा खरा विजय नागपूरच्या पत्रसृष्टीच्या या क्रिकेट स्पर्धेने नोंदविला आहे. हा सर्व संघानी एकत्रितपणे साजरा करायला हवा असा विजय आहे.  
आणि अर्थात, स्पोर्टस जर्नलिस्टस असोसिएशन ऑफ नागपूरचे विशेष अभिनंदन.
मंदार मोरोणे, महाराष्ट्र टाइम्स, नागपूर

No comments: