विको-आंतरप्रेस क्रिकेट ः पंकज बोरकरची अष्टपैलू कामगिरी, व्यवहारेचे तीन बळी
फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यावर उत्तम कामगिरी करीत "सकाळ'ने "टीओआय'चा 36 धावांनी पराभव केला आणि स्पोर्टस जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूरतर्फे आयोजित सोळाव्या विको-एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेत अकराव्या वर्षी सहभागी होताना "सकाळ'ने प्रथमच अंतिमफेरी गाठली. शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात "सकाळ'पुढे "लोकमत'चे आव्हान आहे.
"सकाळ'ने आतापर्यंत चार वेळा उपांत्य फेरीही गाठली आहे. गेल्यावर्षी उपांत्य लढतीत "टीओआय'कडून झालेल्या पराभवाची परतफेड "सकाळ'ने आज केली. आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर नाणेफेक जिंकून "सकाळ'ने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार राजेश व्यवहारेने सलग सातव्या सामन्यात नाणेफेक जिंकण्याचा विक्रम केला. किशोर जामकर आणि सुनील ठवकर या सलामी जोडीने संयमी फलंदाजी करीत 50 धावांची भागीदारी केली. जामकर बाद झाल्यावर सामनावीर पंकज बोरकर आणि ठवकर यांनी 69 धावा जोडल्या. सलग दोन विकेट पडल्यानंतर बोरकर व व्यवहारेने 37 धावांची भागीदारी केल्याने "सकाळ'ला 156 धावा उभारता आल्या.
प्रत्युत्तरात "टीओआय'चे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. एकवेळ त्यांची 5 बाद 48 अशी अवस्था होती. गोलंदाजीला क्षेत्ररक्षणाची जोड मिळाल्याने "सकाळ'ला 36 धावांनी सफाईदार विजय मिळविता आला.
संक्षिप्त धावफलक ः "सकाळ' 20 षटकांत 4 बाद 156 (किशोर जामकर 32, सुनील ठवकर 36, पंकज बोरकर नाबाद 69, रूपेश भाईक 2-39) "टीओआय' 19.4 षटकांत सर्वबाद 120 (सुहास नायसे 45, सूरज नायर 21, राजेश व्यवहारे 3-14, पंकज बोरकर 2-29, सचिन बेलवलकर 2-22, अनिल कांबळे 1-26, किशोर जामकर 1-26).
No comments:
Post a Comment